आपण कुर्त्सगसाज्ड् व्हिडिओवर कितपत विश्वास ठेवू शकता? | Kurzgesagt

🎁Amazon Prime 📖Kindle Unlimited 🎧Audible Plus 🎵Amazon Music Unlimited 🌿iHerb 💰Binance

व्हिडिओ

ट्रान्स्क्रिप्ट

कुर्त्सगेजाक्टच्या व्हिडिओंवर तुम्ही कितपत विश्वास ठेवू शकता?

या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओंवर काम कसं करतो हे आधी आम्ही तुम्हांला सांगू.

मग काही जुन्या व्हिडिओंबद्दल थोडं बोलूयात.

आणि मग थोडं या वाहिनीच्या उद्दिष्टाविषयी.

कुर्त्सगेजाक्टच्या व्हिडिओचा प्रवास सुरु होतो एका मजेशीर किंवा गंभीर प्रश्नासोबत.

जसं, मांसाविषयीच्या आमच्या व्हिडिओनंतर

बऱ्याच जणांनी आम्हांला मांसाहाराच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी विचारलं.

आम्हांला कुठं कल्पना होती! पण भलती उत्सुकता मात्र होती.

मग आम्ही सरळ त्यावर काम करायचं ठरवलं.

पहिलं पाऊल संशोधन.

पुस्तक आणि शास्त्रीय प्रकाशनं धुंडाळून आम्ही एक अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो,

आणि पहिल्यांदा पुष्कळ वाचतो;

एखादी छान गोष्ट या सगळ्यातून मिळतीये, हे बघण्यासाठी.

उत्कंठावर्धक असं त्या कल्पनेत काय आहे?

पहिल्यापेक्षा गोष्टींवर वेगळा प्रकाश टाकणारं, असं काही त्या कल्पनेत मिळतंय का?

की आमचा व्हिडीओ त्या कल्पनेचा एक परिचय किंवा आढावा या स्वरूपाचा असेल?

पहिली वाचनीय आवृत्ती आली की,

आम्ही तज्ज्ञांकडे धाव घेतो

आणि त्यांना आमचं लेखन तपासायला सांगतो.

​​​​​बऱ्याचदा आमची काहीतरी चूक झालेली असतेच.

किंवा विरोधी असं संशोधन आमच्या लक्षात आलेलं नसतं.

या टप्प्यावर मग बऱ्याच कल्पना निकालात निघतात.

यातूनही जर कल्पना तगली, तर मग मात्र आम्ही ती पुढं नेतो.

या प्रक्रियेत काही आठवडे, अनेकदा महिनेही जातात.

उदाहरणार्थ, एकाकीपणावरचं आमचं लेखन पूर्ण करायला आम्हांला दीड वर्षापेक्षाही जास्त वेळ लागला.

सगळ्यात अवघड गोष्ट असते थोडक्यात सांगणं, पण फार सुलभीकरण न करणं.

विस्तृत लेखन करणं हे तसं बरंच सोपं असतं.

इतपत जेव्हा आम्ही सगळं करतो,

तेव्हा आम्ही पुन्हा एकदा संशोधन करून तज्ज्ञांना दाखवतो.

आमच्या लेखनात आतापर्यंत

पुष्कळ फरक पडलेला असणं अपेक्षित असतं.

आम्ही आमचं म्हणून जेव्हा मत व्यक्त करतो, तेव्हा आम्ही त्याचा तसा उल्लेख करतो.

आमच्या संशोधनातून आम्ही निष्कर्षच काढत नाही, असं नव्हे.

होमिओपॅथी निरुपयोगी असते, आणि मांसाहार हा या ग्रहासाठी घातक आहे.

वातावरणातला बदल हे एक भयानक वास्तव आहे आणि पण सेंद्रीय पदार्थ हा काही त्यावरचा मार्ग नाही.

तथ्यं जर एखाद्या निष्कर्षाला बळकटी देत असतील, तर तसं मांडायला काहीच हरकत नाही.

अर्थात, सगळेच यावर प्रसन्न असतील, असं नाही.

एखाद्या विषयातली जाणती व्यक्ती

त्यांच्यामते महत्त्वाचा एखादा उल्लेख राहिला म्हणून

किंवा एखादी तांत्रिक बाब वगळली म्हणून व्यथित होऊ शकते.

व्हिडिओंच्या स्वरूपामुळं त्याबद्दल फार काही करता येत नाही.

साधारण तेराशे शब्द, हा अशा एका लेखनाचा जीव असतो.

त्यामुळं थोडं सरळीकरण हे असतंच.

आमचं संशोधन, त्याचे स्रोत आणि त्याविषयी अजून वाचता यावं असा ऐवज

यांची यादी आमच्या व्हिडिओच्या खाली नेहमीच असते.

अर्थात, ती यादी दिली म्हणून काही आमचं काम अचूक झालं किंवा संशोधन पुरेसं झालं, असं होत नाही.

पण मग म्हणून आम्ही तुम्हांलाच अजून अभ्यास करायला प्रेरित करतो.

मात्र आम्ही नेहमी असंच काम केलंय असं आम्ही म्हणालो, तर ती लबाडी ठरेल.

काही जुने व्हिडीओ आमच्या या आजच्या मानकांवर उतरत नाहीत.

निर्वासितांवरचा आणि व्यसनावरचा, असे दोन व्हिडीओ आमच्या मनात टोचणी बनून राहिले आहेत.

दोन्हींतही एक संतुलित दृष्टीकोण मांडण्याचा पुरेसा प्रयत्न आम्ही केला नाही.

एक भूमिका घेऊन तीच रेटणं, असा जरा प्रकार झाला.

जगाबद्दलचा राग आणि नैराश्य यातून निर्वासितांवरचा व्हिडीओ

२०१५च्या त्यांच्यावरच्या संकटाच्या वेळी जन्माला आला.

‘किती घ्यायचे’ असा वाद आपण घालत होतो; आणि आपल्या किनाऱ्यांशी मृत बालकांचे जथ्थे येऊन पडत होते.

एक रविवार दुपार पकडून त्या व्हिडिओचं लेखन झालं होतं,

आणि चित्रीकरण पुढच्या आठवड्याभरात.

ते सगळंच तणावपूर्ण, निराशाजनक आणि दमवून टाकणारं होतं.

अजूनही, युरोपनं मदत करणं योग्य होतं, असंच आम्हांला वाटतं.

पण त्याविषयी इतक्या तिखटपणानं बोलायची काही गरज नव्हती.

तसं केल्यामुळं आम्ही लोकांचा अपमानही केला आणि त्यांच्या काही खऱ्याखुऱ्या शंकांनाही बगल दिली.

गोष्टींचा शांतपणानं आणि स्पष्ट आढावा घेण्याची गरज असताना

आमचा व्हिडीओ दुफळी निर्माण करणारा आणि भावनाप्रधान होता.

व्यसनावरचा आमचा व्हिडीओ एकाच स्रोतावर बेतलेला होता.

त्याच्यावर गेल्या काही वर्षांत खूप टीका झाली.

आणि दुर्दैवानं आम्ही शास्त्रज्ञांचं साहाय्य घेतलं नाही,

किंवा त्या शास्त्रीय प्रकाशनांवर स्वतःचं असं संशोधनही केलं नाही.

व्यसनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे की,

व्यसन हे केवळ मानसिक स्वरूपाचं आणि व्यक्तीच्या आयुष्यातल्या घटनांवर अवलंबून असतं.

आम्ही ते नाकारत नाही,

पण इतर अनेकांचे यावर मतभेद आहेत,

आणि आम्ही म्हटतो ते सत्य आहे, असं म्हणणंच चूक आहे.

व्यसन पूर्ण समजून घेणंही अजून शक्य झालेलं नाही आणि एकच एक बाजू घेण्याऐवजी

आमच्या व्हिडिओतही हे प्रतिबिंबित व्हायला हवं होतं.

आम्ही त्या कल्पनेचं अवास्तव सुलभीकरण केलं.

त्यामुळं एक मनोरंजक गोष्ट तयार झाली, पण दिशाभूलही झाली.

दोन महिन्यांच्या कालावधीत हे दोन व्हिडीओ तयार केले गेलेले,

आणि आजही आमच्या सगळ्यात जास्त लोकप्रिय व्हिडिओंपैकी ते आहेत.

म्हणजे एक हुकमी रसायन आम्हांला सापडलेलं.

पण पुन्हा आम्ही तसं काही केलं नाही

आणि केलेल्या या दोन व्हिडिओंचं काय करायचं, याचाही खूप काळ विचार करतोय.

इतक्या लोकांना ते आवडलेत यामुळं ते आणखीनच कठीण आहे.

पण आमच्या कामाचा आम्हांला अभिमान वाटावा, अशी आमची इच्छा आहे.

आणि हे दोन व्हिडीओ तसे नाहीत.

म्हणून आम्ही आज ते काढून टाकले.

त्यामुळं काही ते आंतरजालावरून नाहीसे होणार नाहीत,

पण तसा आमचाही हेतू नाही.

खुशाल त्यांना इतरत्र कुठंही चढवा.

व्यसनाविषयीच्या एका नव्या व्हिडिओवर आम्ही काम करत आहोत.

यावेळी रासायनिक आणि मानसिक कारणांकडं आम्ही लक्ष देऊ.

हे काम आम्ही चवीनं करतोय, तेव्हा आणखीन थोडी वाट बघा.

निर्वासितांवरच्या व्हिडिओचं आता औचित्य नाही, त्यामुळं तो काही आम्ही नव्यानं टाकणार नाही.

आमच्या इतरही जुन्या व्हिडिओंबरोबर

स्रोत, टिप्पण्या आणि आणखीन वाचण्यासारखा ऐवज आम्ही टाकत आहोत.

अलीकडं अधिकृत संस्थांवर विश्वास ठेवण्याऐवजी

विश्वासार्ह माहितीसाठी आपण आंतरजालावरच्या निर्मात्यांवरच विसंबतो.

तेच पुरेशी काळजी घेतात आणि अभ्यास करतात

आणि केवळ पैशाकडे बघत नाहीत, असं आपण मानतो.

निश्चयानं चुका टाळाव्यात आणि झाल्याच तर त्या त्यांनी जाहीरपणानं मान्य कराव्यात, अशी आपली त्यांच्याकडून अपेक्षा असते.

आम्ही असं वागायचं ठरवलंय.

विश्वास ही काही एकदाच मिळवून ठेवावी, अशी गोष्ट नाही.

त्यासाठी सातत्यानं कष्ट उपसावे लागतात.

तर, खरंच कितपत विश्वास ठेवू शकता तुम्ही ​​​​कुर्त्सगेजाक्टवर?

आमचा प्रत्येक व्हिडीओ काटेकोर संशोधन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच बाहेर पडतो, यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.

आमच्या पूर्वग्रहांची आम्हांला जाणीव आहे आणि ते आम्हांला दूर करायचे आहेत, यावरही विश्वास ठेवायला हरकत नाही.

विश्वसनीयतेच्या दिशेनं आम्हांला ​​​​कुर्त्सगेजाक्ट अजून पुढं सरकवायचं आहे.

सरळ काहीही उत्तरं देता यावीत, इतकं काही जग सोपं नाही. आणि तशी उत्तरं देण्याची आमचीही इच्छा नाही.

गेली सहा वर्षं हे व्हिडीओ तयार करणं रोमहर्षक होतं. आम्ही त्याबद्दल कृतज्ञ आहोत.

पुढील काही वर्षं तुम्ही आमच्या बरोबरच राहाल

आणि जग वगैरे गोष्टी समजून घेण्याच्या आमच्या प्रवासातले सहप्रवासी असाल, अशी आम्हांला आशा आहे.

धन्यवाद!